बहुप्रतिक्षित इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. २७) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संबंधित संकेतस्थळांवर दिसणार आहेत. या माहितीची प्रत (प्रिंट आउट) विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
पुरवणी परीक्षेसाठी ३१ मे पासून भरा अर्ज |
■ राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांचे ३१ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. याबाबत राज्य मंडळातर्फे स्वतंत्र परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच, दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ या लगतच्या दोनच संधी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहेत. |
येथे निकाल पहा… |
निकाल पाहण्यासाठी इतर संकेतस्थळे |