Home ९ वी बालभारती Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर...

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर – संत जनाबाई

93
0

2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर – संत जनाबाई


संत जनाबाई : वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. संत नामदेवांच्या शिष्या. त्यांना संत नामदेवांच्या सान्निध्यात विठ्ठलभक्तीचा ध्यास लागला. संत जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे.
प्रस्तुत अभंगात संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले,याबाबतचे वर्णन केले आहेत.


धरिला पंढरीचा चोर ।
गळां बांधोनियां दोर ।।१।।

हृदय बंदिखाना केला ।
आंत विठ्ठल कोंडिला ।।२।।

शब्दें केली जवाजुडी ।
विठ्ठल पायीं घातली बेडी ।।३।।

सोहं शब्दा चा मारा केला ।
विठ्ठल काकुलती आला ।।४।।

जनी म्हणे बा विठ्ठला ।
जीवें न सोडीं मी तुला ।।५।।

                        [सकलसंतगाथा खंड पहिला : संत जनाबाईंचे अभंग,अभंग क्र.१८०]
                                                     संपादक-प्रा. डॉ. र. रा. गोसावी.


प्रस्तुत अभंगाचा भावार्थ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडिओ पहा.

मार्गदर्शक : श्री.नेताजी डोंगळे,
                   कोल्हापूर.


स्वाध्याय


प्र.१. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:
अ) विठ्ठल   ⇒   पंढरीचा चोर 
आ)  हृदय  ⇒    बंदिखाना 

प्र.२. जोड्या लावा :

‘अ’ गट उत्तरे 
1. विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने
2. विठ्ठल काकुलती आला ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
3. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी शब्दरचनेच्या जुळणीने

प्र.३. काव्यसौंदर्य:
(अ) सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ लिहा.
उत्तर: संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला आहे.शब्द रचनेच्या साखळीच्या बेडीने त्याचे पाय जखडले. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.

(आ)‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा.
उत्तर : संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडले. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते.

(इ)प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्रीविठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते लिहा.
उत्तर:
श्रीविठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा, असे संत जनाबाई यांना वाटते आहे. त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला. त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदिखान्यात डांबला. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली. त्याच्यावर सोहं शब्दाचा मारा केला. इतकेच नव्हे; तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.

प्र.३.अभिव्यक्ती.
(अ) मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी. एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. मानवी जीवनात निष्ठा, भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे. जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल, तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे.


पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर.

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत जनाबाई.
    2. कवितेचा विषय → विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी, म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे.
  2. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ
    बेडी = साखळी
    जीव = प्राण
    पाय = पद
    हृदय = जिव्हार.
  3. कवितेतून मिळणारा संदेश → भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.
  4. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.
  5. कवितेतून व्यक्त होणारा विचार → श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा, म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदिखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर-शिपाई या रूपकांतून श्रीविठ्ठलाचा निरंतर सहवास. विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव.
  6. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:

             ‘सोहं शब्दाचा मारा केला।
विठ्ठल काकुलती आला ।।
→ संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईंची व्याकुळ होऊन विनवणी करू लागला.

  1. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → श्रीविठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे, ही संत जनाबाईंची श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. ‘प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही,’ या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा, ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला.

    पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
          ‘हृदय बंदिखाना केला।
    आंत विठ्ठल कोंडिला।।’
    उत्तर:
    आशयसौंदर्य: श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.

    काव्यसौंदर्य: श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.

    भाषिक वैशिष्ट्ये: पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here