विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शब्दांच्या जाती आठ आहेत.विकारी आणि अविकारी अशा दोन गटांत त्यांची विभागणी होते. विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो.
नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना विकारी शब्द असे म्हणतात.
अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही.
क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय हे शब्दांचे प्रकार अविकारी शब्दप्रकारात मोडतात.
marathi grammar name
नाम व नामाचे प्रकार पाहुया ….
नाम :-
पुढील वाक्ये वाचा.
(१) तो झाड लावतो.
(२) आरोही, फळा पहा.
(३) अनुराग गोष्ट ऐकतो.
(४) नदीला पूर आला.
(५) मला पुस्तक आवडते.
वरील वाक्यांतील झाड, आरोही, फळा, अनुराग, गोष्ट, नदी, पुस्तक हे शब्द पाहा.
हे शब्द वाचले की आपल्या डोळ्यांसमोर काही वस्तू येतात, व्यक्ती येतात. सामान्यतः ‘वस्तू’ हा शब्द डोळ्याने दिसणाऱ्या पदार्थाला उद्देशून वापरतो; पण व्याकरणात त्याचा अर्थ व्यापक आहे. ‘वस्तू’ या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो.
प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात ‘नामे’ असे म्हणतात.
उदा. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वत्ता.
निरनिराळ्या वस्तूंच्या, पदार्थांच्या, व्यक्तींच्या नावांना नाम असे म्हणतात.
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की, ज्यावरून एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ, प्राणी किंवा त्याचा गुणधर्म याचा आपल्याला बोध होता, त्याला नाम असे म्हणतात.
nam marathi grammar, marathi naam grammar, marathi grammar naam prakar
: नामांचे प्रकार : |
१. सामान्यनाम
- खालील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया :
(१) सरिता हुशार मुलगी आहे.
(२) गोदावरी पवित्र नदी आहे.
(३) मुंबई प्रसिद्ध शहर आहे.
वरील वाक्यांतील-
(१) ‘मुलगी’ हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो.
(२) ‘नदी’ हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो.
(३) ‘शहर’ हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो.
अशा प्रकारे ‘मुलगी, नदी, शहर’ ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.
ही नामे जातिवाचक, म्हणजेच विशिष्ट गटातील आहेत. जातिवाचक नामांना व्याकरणात सामान्यनाम म्हणतात; म्हणून मुलगा, नदी, शहर ही सामान्यनामे आहेत.
एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते, त्याला सामान्यनाम म्हणतात. |
२. विशेषनाम
- पुन्हा तीच वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया :
(१) सरिता हुशार मुलगी आहे.
(२) गोदावरी पवित्र नदी आहे.
(३) मुंबई प्रसिद्ध शहर आहे.
marathi grammar nam
वरील वाक्यांतील-
(१) ‘सरिता’ हा शब्द एकाच मुलीला लागू पडतो.
(२) ‘गोदावरी’ हा शब्द एकाच नदीला लागू पडतो.
(३) ‘मुंबई’ हा शब्द एकाच शहराला लागू पडतो.
अशा प्रकारे ‘सरिता, गोदावरी, मुंबई’ ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात..
ही नामे व्यक्तिवाचक आहेत. व्यक्तिवाचक नामांना व्याकरणात विशेषनाम म्हणतात; म्हणून सरिता, गोदावरी, मुंबई ही विशेषनामे आहेत.
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला विशेषनाम म्हणतात. |
३. भाववाचकनाम
- खालील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष क्या :
(१) सरिताची हुशारी सर्वांना माहीत आहे.
(२) गोदावरीचे पावित्र्य मनात ठसवा..
(३) मुंबई शहरात संपन्नता आहे.
वरील वाक्यांतील –
(१) ‘हुशारी’ हा शब्द सरिताचा गुण दाखवतो.
(२) ‘पावित्र्य’ हा शब्द गोदावरी नदीचा गुण दाखवतो.
(३) ‘संपन्नता’ हा शब्द मुंबई शहराचा गुण दाखवतो..
अशा प्रकारे ‘हुशारी, पावित्र्य, संपन्नता’ ही नावे वस्तूंमधील किंवा व्यक्तींमधील गुणांची नावे आहेत.
ही नामे वस्तूमधील गुण किंवा धर्म किंवा भाव दाखवतात. अशा नामांना व्याकरणात भाववाचकनाम म्हणतात; म्हणून हुशारी, पावित्र्य, संपन्नता ही भाववाचकनामे आहेत.
ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचकनाम म्हणतात. उदा., हुशारी, पावित्र्य, संपन्नता, चांगुलपणा, सौंदर्य, मोठेपणा, नम्रता, लबाडी, चपळाई इत्यादी. |
नामांचा खालील तक्ता नीट अभ्यासा…
सामान्यनामे | विशेषनामे | भाववाचकनामे |
देश | भारत | महानता |
पर्वत | हिमालय | भव्यता |
नदी | गंगा | मंगलता / मांगल्य |
संत | ज्ञानेश्वर | धीरता / धैर्य |
राजा | छ.शिवाजी | शूरता / शौर्य / शूरपणा |
सागर | पॅसिफिक | विशालता |
आई | कावेरी | ममता / मातृत्व |
बाबा | रामराव | प्रेमळपणा |
कुत्रा | टॉमी | इमानीपणा |
गाय | कपिला | साधेपणा |
देव | विष्णू | पावित्र्य / देवपणा |
राक्षस | मारीच | क्रूरता / क्रौर्य |
मुलगा | संदीप | प्रामाणिकपणा |
मुलगी | वैशाली | नम्रता |