[ मराठी बोधकथा ] एक महान वक्ता marathi bodhkatha ek mahan vktaa
नशिबा कडे बोट दाखवून कर्तव्याकडे पाठ फिरवणारे लोक कधीच पुढे येत नसतात.
माझा आवाज बेकार आहे. मी फारसा चांगला दिसत नाही, मला भीती वाटते, मग बोलू कसा? मला जमेल का? असं म्हणत कुढत बसणाऱ्यांसाठी संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंं आहे.
असाध्ये ते साध्य, करिता सायास|
कारण अभ्यास, तुका म्हणे ||
डेमॉस्थेनीस हा जगप्रसिद्ध,महान वक्ता होऊन गेला. या डेमॉस्थेनीसचे ते बालपणाचे व्यक्तीमत्व जर बघितले तर ते वक्ताच काय, साधा व्यवस्थित राहणारा माणूस म्हणून घ्यायलासुद्धा लायक नव्हते.
चांगला वक्ता बनण्यासाठी मारक ठरणाऱ्या दुर्गुणांचा त्याच्याजवळ खजिनाच होता.
त्याचा आवाज चिरका होता.तो तोतरा होता. म्हणजे बोलताना तो अडखळायचा. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, त्याप्रमाणे त्याला बोलताना खांदे उडवायची सवय होती. म्हणजेच बोलणं धड नाही आणि त्यात वारंवार खांदे उडवायचे, असं ध्यान समोर पाहिल्यावर लोक हसतील नाही तर काय होईल? आणि अशा या ध्यानाला वक्ता व्हायचं होतं. आणखी एखादा असता तर नशिबाकडे बोट दाखवून निवांत जगला असता आणि मरूनही गेला असता. ते सुद्धा साधं नावसुद्धा कोणालाही न कळता.
पण डेमॉस्थेनीस अशा लोकांतला नव्हता. त्यांने मनावर घेतले की, वक्ताच होणार आणि चांगला वक्ता म्हणून नाव कमावणार.. झालं ! स्वारी कामाला लागली. त्यानं आपल्यातले अवगुण घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. दोन दिवस जोमाने सुरुवात करून, तिसऱ्या दिवशी थांबणाऱ्या आरंभशूर लोकांपैकी डेमॉस्थेनीस नव्हता.
त्याने प्रथम आपला आवाज सुधारायचं ठरवलं आणि मग तो रोज गावाबाहेर जाऊ लागला. त्यानं दोन गारगोट्या स्वतःच्या तोंडात दोन्ही बाजूंंनी घालून बेंबीच्या देठापासून ओरडायला सुरुवात केली. अशा रीतीने त्याचा आवाज फुटू लागला आणि त्याच्या आवाजातील किनरेपणा आणि तोतरेपणा नष्ट झाला.
आता राहिली खांदे उडवायची सवय. यासाठी त्याने केलेला इलाजच मुळी थरकाप उडवणारा होता.
त्याने आपल्या दोन्ही खांद्याच्या बरोबर वर नंग्या तलवारी ( मूठ वर आणि टोक खाली अशा) आणि बरोबर त्यांच्या टोकाखाली खांदे आणून बोलायला सुरुवात केली.
आता खांदे उडवले की तलवारीची टोके खस्सकन खांद्यात घुसू लागली. त्याचे खांदे रक्तबंबाळ होऊ लागले; त्यातील वेदना पूर्ण अंगभर सळसळू लागल्या. तरीही डेमॉस्थेनीस हरला नाही, थांबला नाही. त्याने शूरपणाने आपले काम तसेच चालू ठेवले.
अशा प्रकारे डेमॉस्थेनीसच्या शूरपणाचं फळ त्याच्या पदरात यश बनून पडलं. हळूहळू तलवारीची दहशत त्याच्या सवयीवर बसली. खांदे उडवणं बंद झालं. तिथून पुढे डेमॉस्थेनीसने मागे वळून पाहिलेच नाही आणि तो महान वक्ता झाला.
‘ प्रयत्नांती परमेश्वर’
तोतरा, खांदे उडवणारा डेमॉस्थेनीस जर वक्ता होऊ शकतो; तर आपल्याला अशक्य असे काय आहे? फक्त कठोर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. म्हटलेलंच आहे:
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता,तेलही गळे|’ आणि ‘यत्न तोची देव जाणावा !’
त्यामुळे डेमॉस्थेनीस च्या गोष्टी मधून स्फूर्ती घेऊन, आपणही चांगला वक्ता होण्यासाठी प्रयत्न कराल यात शंकाच नाही.
https://www.marathistudy.com/balbharti-kishor-goshti/
Nice