जन पळभर म्हणतील – मराठी कविता jan palbhar mhntil – marathi kvita
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ – डिसेंबर ७, १९४१), अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा.तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. |
जन पळभर म्हणतील ( कविता ) |
जन पळभर म्हणतील ‘हाय हाय’
मी जाता राहिल कार्य काय?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल काहि का अंतराय?
मेघ वर्षतील शेतें पिकतील,
गर्वाने या नद्या वाहतील,
कुणा काळजी की न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय?
सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपुल्या कामि लागतील
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय?
रामकृष्णही आले, गेले
त्यांविण जग का ओसचि पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मजशिवाय?
अशा जगास्तव काय कुढावे?
मोहि कुणाच्या का गुंतावे?
हरिदूता का विन्मुख व्हावे?
का जिरवु नये शांतीत काय?
jan palbhar mhntil – marathi kvita