Home बोधकथा Inspiring Story Of Spanish Runner

[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner

40
0

[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner

एका स्पॅनिश धावपटूने जगाला दाखवून दिले, जिंकणे सर्वकाही नसते..

नुकताच एक प्रसंग वाचण्यात आला. एका धावण्याच्या शर्यतीत केनियाचा धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून अगदी काही फूट अंतरावर होता. पण तो गोंधळला आणि त्याला असे वाटले की आपण शर्यत पूर्ण केली. तो धावायचं थांबला. त्याच्या अगदी पाठीमागे स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिस होता. हाबेलची चूक त्याच्या लक्षात आली. तो अजून तुझी शर्यत पूर्ण झाली नाही, अंतिम रेषा पार कर म्हणून ओरडून सांगू लागला. पण त्याची भाषा हाबेलला येत नसल्याने त्याला काहीच कळत नव्हते. शेवटी इव्हानने या केनियाच्या धावपटूला अक्षरश: अंतिम रेषेच्या पलीकडे ढकलून दिले आणि जिंकण्यास मदत केली. जर ठरवले असते तर इव्हान स्वतः पुढे जाऊन ही शर्यत जिंकू शकला असता पण त्याने तसे केले नाही,
शर्यंत संपल्यानंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले की, “तू असे का केले?” त्यावर इव्हानने दिलेले उत्तर खूप महत्त्वाचे आहे. तो म्हणाला “माझे स्वप्न आहे की एक दिवस आपण अशा जगात राहू जिकडे लोक आपल्या फायट्यापेक्षा जे बरोबर आहे ते करतील. खरं तर मी त्याला जिंकू दिलेले नाही, तो जिंकणारच होता. ” पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला पण तू जिंकू शकला असतास तुझा देश जिंकू शकला असता. तेव्हा इव्हान हसून म्हणाला, “पण माझ्या अशा विजयाची योग्यता काय असेल? त्या पदकाचा सन्मान काय असेल? माझा परिवार, माझ्या देशातील लोक या विजयाबद्दल काय विचार करतील? नैतिदृष्ट्या ते अयोग्य ठरले नसते का?”
मित्रांनो, हा एक छोटासा प्रसंग मात्र आपल्याला आयुष्याचा एक मोठा धडा शिकवून जातो. आपल्या आयुष्यात नैतिक मूल्ये किती महत्त्वाची आहेत हे आपण यातून शिकतो. सामाजिक नियमांशी सुसंगत वर्तन म्हणजे नैतिकता होय. आपल्याला फक्त जिंकायचेच नाही. त्यासोबत आपल्याला चारित्र्यसंपन्न विद्यार्थी म्हणूनही आपली जडणघडण करायची आहे. यशाला जेव्हा नैतिकतेची, सदाचाराची किनार असते तेव्हा ते अधिक खुलून दिसते. आपल्याला सुखी, समृद्ध, गतिमान आणि यशस्वी तर व्हायचे आहेच पण त्याआधी एक चांगला माणूस देखील व्हायचे आहे. नैतिकता हे अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे. व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीत त्याचे खूप महत्त्व आहे. आपल्याला भविष्यात उत्तम उदात्त आणि उन्नत व्हायचे असेल तर उच्च नैतिक मूल्याचा हात कधीच सोडू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here