आश्वासक चित्र कविता 10 वी मराठी Marathi – Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board
कवयित्रीचा परिचय कवयित्रीचे साहित्यलेखन कवितेचा आशय |
कवितेचा भावार्थ |
प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेविषयी आश्वासक चित्र रेखाटले आहे. ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत आहे. ती आपल्या बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने थोपटत निजवत आहे. तेव्हाच ती दुसऱ्या बाजूला भात शिजवण्यासाठी चिमुकल्या गॅसवर एका टोपात भाताचे आधण ठेवत आहे. तिचा स्वतःचा लुटुपुटुचा संसार सुरू आहे. तर बाजूला एक मुलगा चेंडू घेऊन तो उंच उडवून पुन्हा तो नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळत आहे. त्याचा हा खेळ ती मुलगी कौतुकाने पाहते आणि अचानक आपल्या मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. तो मुलगा पुन्हा तिला आपले चेंडू उडवून झेलण्याचे कसब दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते तेव्हा तो हसून तिची चेष्टा करत म्हणतो- ‘तू छानपैकी पाल्याची भाजी बनव’ कारण त्याला वाटत असते की आपल्याप्रमाणे हिला चेंडूचा खेळ जमणार नाही (भाजी करणे हे तुझे काम । तुला अशी पुरुषी कामे काय जमणार?) तेव्हा मुलगी त्याला म्हणते “मी दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते (स्त्रीची व पुरुषाची) ‘तू करू शकशील?’ असा उलट प्रश्न ती त्याला विचारते. मुलगा स्वतः चा चेंडू तिच्या हाती देतो. हातात आलेला चेंडू ती उंच उडवते. तो आभाळाला स्पर्श करून नेमका तिच्या ओंजळीतच पडतो. (तिला या पुरुषाच्या कामात यश मिळाले) हे पाहून मुलगा आश्चर्यचकित होतो. ती चेंडू आपल्यासारखाच झेलू शकते याचे आश्चर्य ‘आता तुझी पाळी! तू माझे काम करून दाखव”, असे मुलगी मुलाला वाटते मुलाला म्हणते मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो व मग भाजी करण्यासाठी पातेलं शोधतो. कवयित्रीने येथे आशावादी दृष्टिकोन निर्माण करून म्हटले आहे, की तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळायलाही हळूहळू शिकेल (भूतकाळातील असमानतेची दरी वर्तमानकाळात हळूहळू नष्ट होऊन भविष्यकाळात पूर्णच नष्ट होईल आणि स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल, हा आशावादी दृष्टिकोन कवयित्रीने येथे दाखवला आहे.) चेंडू जोडीनं. ती म्हणते, माझ्या झरोक्यातून भविष्यातल्या जगाचे आश्वासक उत्साहवर्धक चित्र मला दिसते. उदयाच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील. भातुकलीच्या लुटुपुटु स्वप्नाळू जगातून वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा (म्हणजे स्त्री-पुरुषांचा) हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू दोन्ही स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. म्हणजेच, भविष्यात स्त्री-पुरुषांमध्ये परस्पर स्नेह आणि सामंजस्याची भावना निर्माण झालेली असेल. |
(१) कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
भविष्यातील स्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र | मुलगी, मुलगा | स्त्री-पुरुष समानता | मी करू शकते एकाचवेळी. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही ज्यावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन. |
(२) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
१. तापलेले ऊन –
पुरुषप्रधान व्यवस्थेत स्रीवर लादली गेलेली असमानता
२.आश्वासक चित्र –
भूतकाळातील स्री-पुरुष भेद नष्ट होऊन भविष्यात त्यांच्यात समानता प्रस्थापित होईल असा आशावाद.
(३) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी.
(अ) ‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’
(आ) उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
(४) चौकट पूर्ण करा.
कवयित्रीच्या मनातला आशावाद – | भविष्यातील स्री-पुरुष समानता |
(५ ) कवितेतील खालील घटनेतून / विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
(अ) मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर | बदल स्वीकारण्याची मानसिक तयारी |
(आ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी | आत्मविश्वास |
(इ ) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी | समानतेची भावना |
उपयोजित लेखन |
कथालेखन
बातमी लेखन
संवाद लेखन
पत्रलेखन
जाहिरात लेखन
सारांश लेखन
( ६ ) काव्यासौंदर्य.
कृती: १. ती म्हणते, ‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: ‘आश्वासक चित्र’ या कवयित्री नीरजा यांच्या कवितेतून त्यांनी भविष्यातील स्त्री-पुरुष समानतेविषयीचे आश्वासक चित्र मांडले आहे. बाहुली व चेंडू हे खेळ ही स्त्री पुरुषांच्या पारंपरिक कामांचे प्रतिनिधित्व करतात. या कवितेतील मुलगा व मुलगी एकमेकांचे खेळ सहजपणे आत्मसात करतात, त्याचप्रमाणे ते भविष्यातही एकमेकांच्या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडून समानतेचे जीवन स्वीकारतील असे सकारात्मक चित्रण कवयित्रीने केले आहे.
घराच्या झरोक्यातून दिसणाऱ्या दृश्यातली मुलगी भातुकली खेळत आहे. मध्येच तिचे लक्ष बाजूला चेंडूने खेळणाऱ्या मुलाकडे जाते व ती मांडीवरची बाहुली व भातुकली बाजूला सारून त्याच्याकडे जाते. ती त्याच्याकडे चेंडू मागते; पण तो तिला हिणवून म्हणतो, तू पाल्याची भाजी कर (स्वयंपाक मुलींचे काम आहे, ते तू कर.); पण पूर्ण आत्मविश्वासाने ती त्याला सांगते, की मी स्वयंपाक करणे आणि चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते; पण तुला हे जमेल का? स्त्रियांच्या समजल्या जाणाऱ्या कामांसोबतच, पुरुषांची म्हणून समजली जाणारी कामेही आपण करू शकतो, हेच ती मुलगी सांगू पाहत आहे. मुलीच्या तोंडी असलेले हे उद्गार आधुनिक स्त्रीचा आत्मविश्वास व सामर्थ्य मार्मिकपणे अधोरेखित करतात. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारा हा कवितेतील सार्वकालिक विचार हा येत्या उज्ज्वल भविष्याकरता आशादायी व सकारात्मक आहे.
कृती: २.कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: कवितेतील मुलगी बाहुली घेऊन भातुकलीचा खेळ खेळते; तर कवितेतला मुलगा चेंडू उंच उडवण्याचा खेळ खेळतो. मुलीला मुलाच्या खेळाचे कौतुक वाटून तीही त्याच्याकडे चेंडू खेळण्याकरता मागते; पण मुलगा तिला स्वयंपाक कर असे सुचवतो. या प्रसंगावरून मुलगी ही समाजात दुय्यम स्थान मिळणाऱ्या घटकाचे म्हणजे स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, तर मुलगा हा पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो हे दिसून येते; मात्र ही स्त्री आता बदलू पाहत आहे. स्त्रियांची अशी समजली जाणारी कामे करण्यासोबतच तिचे क्षितिज विस्तारून पुरुषांची समजली जाणारी कामेही ती सहजगत्या करू लागली आहे. कवितेतील मुलगी भातुकली व चेंडू दोन्ही खेळून दाखवते व स्त्रीच्या याच कर्तृत्ववान व आत्मविश्वासपूर्ण रूपाचे प्रतिनिधित्व करते.
कृती: ३. ‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
उत्तर: भारतात पूर्वापार पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रस्थ असलेले आढळून येते. त्यामुळे, स्त्रियांना कायम दुय्यम स्थान दिले जाते; परंतु समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य झाले आहे. आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले भरीव योगदान देताना दिसतात. तरीही आजही स्त्रियांना सर्वत्र समानतेची वागणूक मिळतेच असे नाही. स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात अमलात येण्याकरता काही गोष्टींत बदल होण्याची गरज आहे असे मला वाटते. स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाचे मूळ हे पुरुषप्रधान मानसिकतेत आहे. त्यामुळे, सर्वप्रथम पुरुषप्रधान मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलास वाढवतानाच समानतेची मूल्ये रुजवायला हवीत. जेव्हा कोवळ्या वयातच समानतेचे बीज मुलांच्या मनात पेरले जाईल तेव्हाच समानतेस स्वीकारणारा भविष्यातील समाज तयार होईल असे मला वाटते. जेव्हा घराघरांत स्त्री-पुरुष असा भेद न उरता, घरातली प्रत्येक जबाबदारी, कर्तव्ये ही दोघांची आहेत याची जाणीव होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता अस्तित्वात येईल.
खालील कवितेच्या ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा. |
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही.’
उत्तरः
कवयित्री नीरजा आपल्या आश्वासक चित्र या कवितेतून मुला-मुलींच्या खेळातून स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रंगवत आहेत.
यातील मुलगी भातुकली बाजूला सारून तथाकथित पुरुषी खेळ ‘चेंडू’ खेळते आणि मुलगा चेंडू मुलीकडे देऊन स्त्रियांचा समजला जाणारा ‘भातुकली’ खेळ खेळू लागतो. या प्रसंगातून कवयित्रीला अशी आशा वाटत आहे, की ही लहान मुलं भविष्यात मोठी होऊन या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडून परस्पर सामंजस्य व सहकार्याने जीवन जगतील; ज्यामुळे आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्री-पुरुषातील भेदाभेद नष्ट होतील खऱ्या अर्थाने स्त्री व पुरुषांतली दरी मिटून जाईल. ज्या सहजतेने ही मुले एकमेकांचे खेळ खेळतात. त्याच सहजतेने ही मुलं उदया मोठी झाल्यावर प्रत्यक्ष जीवनात एकमेकांची कामे करतील व दोघे मिळून सर्व जबाबदाऱ्या उचलतील याची कवयित्रीला खात्री वाटते आधुनिक स्त्रीचा स्वकर्तृत्वावरचा विश्वास, आव्हान पेलण्याची तिची तयारी, तसेच स्त्रीची क्षमता पाहून स्वतःची मानसिकता व त्यानुसार वर्तणूकही बदलणारा पुरुष हे या ओळींतून डोळ्यांसमोर उभे राहतात.
भविष्यात स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र प्रत्यक्षात साकार होईल हा सार्वकालिक विचार येथे मांडला आहे. संपूर्ण कविता या स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्याविषयी बोलते. मुक्तछंदातील ही काव्यपंक्ती कवयित्रीच्या साध्या, संवादात्मक भाषाशैलीमुळे चिंतनशील विचार सहज मांडून जाते.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची’.
उत्तर:
आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा याच्या कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले असून ते भविष्यात प्रत्यक्ष साकार होईल असा विचार मांडला आहे.
भातुकली व चेंडू हे खेळ स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक कामाचे प्रतिनिधित्व करतात. प्रस्तुत काव्यपंक्तात मुलीने मुलाकडे चेडू मागताच मुलगा हसून तिची चेष्टा करत म्हणतो तू छानपैकी पाल्याची भाजी बनव’ कारण त्याला वाटत असते, की आपल्याप्रमाणे हिला चेंडूवा खेळ जमणार नाही. (भाजी करणे हे तुझे काम तुला अशी पुरुषी कामे काय जमणार?) यातून त्याची पुरुषी मानसिकता अघोरेखित होते.
संवादात्मक भाषेच्या माध्यमातून व भातुकली, चेडू यांसारख्या प्रतिमांच्या वापरातून ही कविता आपल्याला चिंतनशील बनण्यास प्रवृत्त करते. मुक्तछंदातील या कवितेत साध्या सोप्या भाषेतून स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी कुमारभारती इयत्ता : दहावी |
आश्वासक चित्र -नीरजा
बोलतो मराठी... – डॉ.नीलिमा गुंडी
आजी : कुटुंबाचं आगळ -प्रा.महेंद्र कदम
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता ) - द.भा.धामणस्कर
गवताचे पाते - वि.स.खांडेकर
वाट पाहताना - अरुणा ढेरे