३. कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
म्हाइंभट (तेरावे शतक) : मराठीतील पहि ले चरित्रकार. महानुभाव पंथाचे प्रवर्तक. महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी. चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांंच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला. नंतर ‘गोविंंदप्रभूचरित्र’ ही लिहिले. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्र’ हा अत्यंत महत्त्वा चा ग्रंथ आहे.
कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितलेला आहे. कोणत्या ही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे, हे प्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे.
डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते: ते सी बाजत होते: तेणे भक्तीजनासी व्यापार होववे ना: आन भट व्यापार करु लागले: नाथोबाए म्हणीतलें: ‘‘नागदेया: तू कैसा काही हींवसी ना?’’ तवं भटी म्हणीतलें: ‘‘आम्ही वैरागी: काइसीया हीवु:’’ यावरी सर्वज्ञें म्हणीतलें: ‘‘वानरेया: पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडे: हाही एकू विकारुचि कीं गा:’’ यावरि भटी म्हणीतलें:‘‘जी जी: निर् वीकार तो कवण:’’ सर्वज्ञें म्हणीतलें: ‘‘वानरेया: पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही: मा तु काइ वेगळा अससि:’’ ‘‘हो कां जी:’’ यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपीला: ‘‘कव्हणी एकू कठीया असे: तो भोगस्थानाची सुश्रुषा करी: झाडी: सडा संमार्जन करी: ते देखौनि गावीचे म्हणति : ‘कठीये हो नीके करीत असा: बरवे करीत असा:’ ते आइकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवी: तयासि देवता आपुले फळ नेदी : तयासि कीर्तीचेचि फळ झाले:’’
[लीळाचरित्र उत्तरार्ध : एकांक लीळा क्र. १२०]
संपादक-प्रा. पुरुषोत्तम नागपुरे.
पाठ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडिओ पहा.
मार्गदर्शिका : सौ.सुषमा मानेकर,
अमरावती.
स्वाध्याय
प्र. १. काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
(१) वानरेया – नागदेवाचार्य
(२) सर्वज्ञ – श्रीचक्रधरस्वामी
(३) गोसावी – श्रीचक्रधरस्वामी
प्र. २. आकृती पूर्ण करा.
निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती | कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये | लोकांनी स्तुती केल्यावर फुशारून जाण्याची सवय |
प्र. ३. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
प्रस्तुत दृष्टान्ताद्वारे आपल्याला हा उपदेश मिळतो की, प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही परंतु आपले मन वाईट विचारांपासून दूर ठेवले पाहिजे. तसेच आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांचा गर्व बाळगणे हा देखील एक विकारच आहे. म्हणून वाईट व चांगल्या वाटणार्या सर्व विकारांपासून माणसाने स्वतःला दूर ठेवून स्वतःचे मन शुद्ध ठेवले पाहिजे.
प्र. ४. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
कठिया – पुजारी
सी – थंडी
काइसिया – कसली
कव्हनी – कोणी
प्र. ५. ‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारांनुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टांची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र, आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच, नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला; अवगुण ठरला.
प्र. ६. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घडलेली घटना आहे. आमच्या परिसरातील शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विदयार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विदयार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री. वसंतराव नाटेकर या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
आपण विदयार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले, रात्ररात्र जागरणे केली, जेवणाखाण्याची पर्वा केली नाही. स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, वगैरे त्यागाचे वसंतरावांनी भरभरून वर्णन केले. हे सर्व खरेच होते. पण बोलता बोलता ते स्वत:ची स्तुती करू लागले. तेव्हा लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर “मी नसतो तर विदयार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते,” असेही ते म्हणाले. यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्त्व आम्हांला या प्रसंगात पाहायला मिळाले.
( वरील उत्तरे मार्गदर्शक आहे, आपल्या भावविश्वातील उदा.लिहावी.)
खूप छान