२.१. संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
संत नामदेव (१२७०-१३५०) : वारकरी संप्रदायातील संतकवी. संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून ‘भक्त नामेदवजी की मुखबानी’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तकरूपाने १८९२
मध्ये प्रथम लोकांसमोर आली.
प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे.
जैसा वृक्ष नेणे मान अपमान ।
तैसे ते सज्जन वर्तताती ।।१।।
येऊनियां पूजा प्राणि जे करिती ।
त्याचें सुख चित्तीं तया नाही ।।२।।
अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती।
तया न म्हणती छेदूं नका ।।३।।
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।४।।
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी ।
तरी जीव शिवा गांठी पडूनि जाय ।।५।।
[सकलसंतगाथा खंड पहि ला : संत नामदेव महाराजांची अभंगगाथा अभंग क्र.१४७७ ]
संपादक-प्रा. डॉ. र. रा. गोसावी.
अभंगाचा भावार्थ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडिओ पहा
मार्गदर्शक : डॉ.देविदास गुरव,
सोलापूर
स्वाध्याय
प्र.१. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा :
वृक्ष | संत |
वृक्षांना त्यांच्या मान अपमानाची पर्वा नसते. | संताच्या लेखीही मान-अपमानाला मह्त्व नसते. |
कोणी वृक्षावर घाव घातले, तरी ते विरोध करत नाहीत. | संताचीही कोणी निंदानालस्ती केली तरी त्यांना त्याचे दुःख वाटत नाही. |
प्र.२. वृक्षावर खालील घटनांंचा होणारा परिणाम लिहा :
वृक्ष | घटना | परिणाम |
वंदन केले | सुख होत नाही. | |
घाव घातले | विरोध करत नाही. छेदू नका, असे म्हणत नाही. |
प्र.३. पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
(इ) संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत.
(ई) संत सुख आणि दु:ख समान मानतात.
उत्तर:
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
(ई) संत सुख आणि दु:ख समान मानतात.
प्र.४. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. वृक्ष ⇒ झाड,तरू
2. सुख ⇒ सौख्य
3. सम ⇒ समान,सारखे
प्र.५. काव्यसौंदर्य.
(अ) ‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।’ या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
वृक्षाला मान-अपमान यांची फिकीर नसते. कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले, तरी त्या माणसांना ते ‘मला तोडू नका’ असेही म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.
(आ) ‘निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।’ या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे.
प्र.५. अभिव्यक्ती.
(अ) प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आपण करायला हवे. निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पूर्ण धैर्यवंत संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. संतांचे वर्तन वृक्षांसारखे असते. वृक्षांना मान-अपमान ठाऊक नसतो. कुणी पूजा केली काय किंवा घाव घातला काय, वृक्ष अविचल असतात. माणसाचे वागणेही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा -हास करू नये, उलट वृक्षलागवड व संवर्धन करावे, असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिला आहे.
(आ) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत. संतसज्जनही निरिच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही. संतसज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे.
(इ ) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा.
उत्तर:
‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे. त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या-गांजल्या माणसांची जो मदत करतो, त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. ‘पुण्य परउपकार । पाप ते परपीडा’ असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो.
पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे.
उत्तर:
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत नामदेव.
- कवितेचा विषय → या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.
- कवितेतील दोन शब्दांचे अर्थ → (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.) वृक्ष = झाड
चित्त = मन
निंदा = नालस्ती
सम = समान
धैर्य = धीर
जीव = प्राण.
- कवितेतून मिळणारा संदेश → संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.
- कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे.
- कवितेतून व्यक्त होणारा विचार → संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.
- कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।
→ निंदा आणि स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात. असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. - कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.https://www.marathistudy.com/std-9-th-marathi…yaachaa-drustant/
इन्स्पायर अवॉर्ड्स-मानक योजना 2022-23 परिपत्रक 👇👇 Online Salary Slip in Shalarth प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
– –