Home १० वी बालभारती कवितेच्या ओळींचे रसग्रहण ( इयत्ता दहावी : मराठी कुमारभारती )

कवितेच्या ओळींचे रसग्रहण ( इयत्ता दहावी : मराठी कुमारभारती )

कवितेचे रसग्रहण कसे लिहावे?,रसग्रहण म्हणजे काय 10 th?,कवितांच्या ओळींचे रसग्रहण-( कविता ) उत्तमलक्षण ,वस्तू ,आश्वासक चित्र, भरतवाक्य , खोद आणखी थोडेसे, आकाशी झेप घे रे, तू झालास मूक समाजाचा नायक

26
0

कवितेच्या ओळींचे रसग्रहण

प्रश्न २ (इ) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत ४ गुणांचा हा प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :
पाठ्यपुस्तकातील प्रश्न २ (अ) व (आ) साठी दिलेल्या कविता सोडून कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल :
ही कृती सोडविण्यासाठी अभ्यास असा करावा…
रसग्रहण 
आशयसौंदर्य  काव्यसौंदर्य  भाषिक वैशिष्ट्ये
यामध्ये कवीचे /कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती), आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती यावी. हे मुद्देही कवितेतील  कोणत्याही ओळींसाठी  साधारणपणे सारखेच असतील.
💨कवींचे /कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादींसाठी कविता नीट अभ्यासावी.

कविता : उत्तमलक्षण  ( संतकाव्य )
‘जनीं आर्जव तोडूं नये पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।
आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी प्रस्तुत ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.
काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात- लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

‘अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची।।’ (नोव्हें. ‘२०)
आशयसौंदर्य : संत रामदासांनी ‘उत्तमलक्षण या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे. 
काव्यसौंदर्य : संत रामदास म्हणतात लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांना समजतील असे तीन मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितले आहेत. अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोधी शब्दांमुळे ओवीची खुमारी वाढली आहे. दृढ धरणे हा वाक्प्रचार चपखलपणे उपयोगात आणला आहे. जनमानसावर तत्त्व ठसवण्याची समर्थांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे.

इयत्ता दहावी मराठी कुमारभारती सर्व कवितांचे रसग्रहण


सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथे जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।
आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या ‘श्रीदासबोधातील’ उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा खुलासा त्यात केला आहे.
काव्यसौंदर्य : सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, असत्याच्या वाटेवर कधीही जाऊ नये व खोटेपणाचा अभिमानही कधी बाळगू नये, असा संदेश प्रस्तुत काव्यपंक्तीतून मिळतो. सर्वज्ञपणा अंगी बाणवण्यासाठी या आदर्श गुणांची आवश्यकता असल्याचे संतकवी रामदास पटवून देतात. हे संतकाव्य वाचल्यावर शांतरसाचा अनुभव मिळतो.
भाषिक वैशिष्ट्ये : साडेतीन चरणांच्या या ओवीतील, पहिल्या तीन चरणांत ‘नये’ या शब्दाची पुनरावृत्ती होऊन अंत्ययमक साधले गेले आहे, त्यामुळे काव्याला नादमयता प्राप्त झाली आहे. तसेच, यात विरुद्ध अर्थांच्या शब्दांची योजना करून काव्यसौंदर्य साधले गेले आहे. उदाहरणार्थ, सत्यमार्ग सांडूं नये असत्य पंथे जाऊं नये । । ‘सत्यमार्ग’ यासारख्या सामासिक शब्दाची योजना करून एकाच नेमक्या शब्दात अचूक अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. सांडू, पंथें, जाऊं अशी अनुस्वार असलेली शब्दांची जुनी भाषिक रूपे यात आढळतात. तत्कालीन मराठी संतकाव्यातील भाषेचे आशय व भावसौंदर्य यांत पाहायला मिळते. शांतरसाचा अनुभव देणारी ही रचना वैशिष्ट्यपूर्ण वाटते.

कविता : वस्तू.  
‘वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.’ (मार्च ‘२०) 
आशयसौंदर्य : ‘वस्तू’ या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे आणि त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.
काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की, कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.
भाषिक वैशिष्ट्ये : मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवींनी दिला आहे.

वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही.
आशयसौंदर्य :‘भरून आलेले आकाश’ या काव्यसंग्रहातील ‘वस्तू’ या कवी द. भा. धामणस्कर लिखित कवितेतून निर्जीव वस्तू यासुद्धा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात व या वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे असा विचार मांडला आहे. 
काव्यसौंदर्य : वस्तूंना जरी मानवी भावना नसल्या, तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवीं म्हणतात. वस्तूंमुळे आपल्या गरजा भागतात. त्यामुळे, त्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे, वस्तूंचे आपल्या आयुष्यातील मोल लक्षात घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे व त्यांची मानाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे. माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे; परंतु वस्तूंमधून आपला स्नेह जिवंत ठेवणे शक्य असते. अशाप्रकारे, निर्जीव गोष्टींबद्दलही कृतज्ञताभाव व स्नेह जपण्याचा संदेश यातून व्यक्त होतो.
भाषिक वैशिष्ट्ये :मुक्तछंदातील प्रस्तुत पदयपंक्तीत चिंतनशीलता, भावोत्कटता व प्रांजळपणा हे विशेष जाणवतात. साध्या, सोप्या भाषेतून ‘वस्तूंनाही भावना असतात’ हा अनोखा आशय कवीने मांडला आहे. ‘वस्तू’ या निर्जीव घटकावर लाडावून ठेवणे यासारख्या मानवी गुणाचा आरोप झाल्यामुळे येथे चेतनगुणोक्ती अलंकार साधला गेला आहे. त्यामुळे काव्यसौंदर्यात भर पडली आहे.

आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
आशयसौंदर्य : ‘भरून आलेले आकाश’ या काव्यसंग्रहातील वस्तू’ या कवी द. भा. धामणस्कर लिखित कवितेतून निर्जीव वस्तू यासुद्धा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात व या वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे असा विचार मांडला आहे. जरी त्यांना मानवी भावना नसल्या, तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवी म्हणतात.
काव्यसौंदर्य : एखादया वस्तूची कार्यक्षमता संपुष्टात आली, ती वापरण्यास अयोग्य झाली, की तिला घराबाहेर काढले जाते; पण वर्षानुवर्षे आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे, असा संदेश प्रस्तुत काव्यपंक्तींतून व्यक्त होतो
भाषिक वैशिष्ट्ये : ही कविता मुक्तछंदातील आहे. चिंतनशीलता, भावोत्कटता व प्रांजळपणा हे विशेष यातं जाणवतात. साध्या, सोप्या भाषेतून अनोखा आशय कवीने मांडला आहे. संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता कवीने अतिशय संयमाने निवेदनात्मक स्वरूपात व्यक्त केली आहे.. वस्तूंवर (अचेतन गोष्ट) मानवी गुणांचा (सचेतन गोष्टीचा) आरोप केला असल्यामुळे येथे चेतनगुणोक्ती अलंकार तयार झाला आहे. त्यातून अनोखे भावसौंदर्य आकाराला आले आहे.

कविता – आश्वासक चित्र
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’
आशयसौंदर्य : आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा यांच्या कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले असून ते भविष्यात प्रत्यक्ष साकार होईल असा विचार मांडला आहे. 
काव्यसौंदर्य : भातुकली व चेंडू हे खेळ स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक कामांचे प्रतिनिधित्व करतात. प्रस्तुत काव्यपंक्तींत मुलीने मुलाकडे चेंडू मागताच मुलगा हसून तिची चेष्टा करत म्हणतो – ‘तू छानपैकी पाल्याची भाजी बनव’ कारण त्याला वाटत असते, की आपल्याप्रमाणे हिला चेंडूचा खेळ जमणार नाही. (भाजी करणे हे तुझे काम ! तुला अशी पुरुषी कामे काय जमणार?) यातून त्याची पुरुषी मानसिकता अधोरेखित होते.
भाषिक वैशिष्ट्ये : संवादात्मक भाषेच्या माध्यमातून व भातुकली, चेंडू यांसारख्या प्रतिमांच्या वापरातून ही कविता आपल्याला चिंतनशील बनण्यास प्रवृत्त करते. मुक्तछंदातील या कवितेत साध्या सोप्या भाषेतून स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.’
आशयसौंदर्य : कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र’ या कवितेमधून स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरीत्या कसे साकारले जाईल, याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकांतून योग्यपणे दाखवली आहे.
काव्यसौंदर्य : भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते. त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. स्त्री-पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल, तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री-पुरुष परस्परांची कामे मिळून करतील, असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळींतून साकारले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. ‘स्त्री-पुरुष समानता’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र ‘हातात हात असेल’ या वाक्यखंडातून प्रत्ययकारीरीत्या प्रकट झाले आहे. स्वप्न व सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दांत व्यक्त झाली आहे.

कविता – भरतवाक्य 
‘मुखीं हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली, ין क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली।
आशयसौंदर्य : प्रस्तुत ओळ कवी मोरोपंतांच्या ‘केकावली’ संग्रहातील व ‘भरतवाक्य’ या रचनेतील आहे. या केकावल्यातून कवी मोरोपंत सद्गृहस्थ किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे त्यांच्या विचारांच्या सान्निध्याचे महत्त्व सांगू पाहत आहेत. कोणत्याही लोभा-मोहाला बळी पडू नये, वृथा अभिमान सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा आणि भगवद्भक्तीत मन रमवावे, असा आशय या केकावलीतून व्यक्त होतो
काव्यसौंदर्य :  मोरोपंतांच्या प्रस्तुत केकावलीची भाषा संस्कृतप्रचुर, अलंकारयुक्त मराठी शब्दांनी सजलेली आहे. पंडिती काव्याचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य तिच्यात आढळते. सकलकामना, कुशलधामनामावली यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द कवीने कवितेत ठिकठिकाणी पेरले आहेत. अशा शब्दांतून यमक अलंकार साधल्यामुळे या कवितेला एक गेयता प्राप्त झाली आहे. यात आर्यावृत्त वापरले गेले आहे. श्लोकांसारखी ओघवती, रसपूर्ण, प्रासादयुक्त भाषा वापरल्यामुळे हे काव्य श्रवणीय वाटते. 
भाषिक वैशिष्ट्ये : ‘केका’ म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे पंक्ती. मोरोपंतांनी स्वतःस ‘मोर’ कल्पून, ईश्वराला मारलेल्या हाकांना, ईश्वराच्या केलेल्या आळवणीला ‘केकावली’ असे म्हटले गेले आहे. ज्याप्रमाणे नाटकात शेवटी भरतवाक्य म्हटले जाते त्याप्रमाणे केकावलीच्या उपसंहारातील शेवटच्या पयरचनेला ‘भरतवाक्य’ म्हणतात. हेही या रचनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

‘सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो.’
आशयसौंदर्य : ‘केकावली’ या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही ‘भरतवाक्य’ काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे, याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे.
काव्यसौंदर्य :  ‘सुसंगती’ म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. ‘सुजनवाक्य’ म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते. असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी हे ‘केकावली’ नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. ‘घडो-जडो’ या यमकप्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.

कविता – खोद आणखी थोडेसे
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’
आशयसौंदर्य : ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.
काव्यसौंदर्य : कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.
भाषिक वैशिष्ट्ये : साध्या, सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘झरा’ या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे.

धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. 
आशयसौंदर्य : कवयित्री आसावरी काकडे यांच्या ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेतून जिद्द, चिकाटी व उमेद बाळगून कष्टाची कास धरली, तर यश प्राप्त होतेच हा अतिशय सकारात्मक संदेश या कवितेतून  प्राप्त होतो.
काव्यसौंदर्य : अपयशाने हार न मानता, आशावादी राहून अधिकाधिक प्रयत्न केल्यास आपले ध्येय साध्य करता येते. धीर न सोडता आपण उमेदीने पुढे गेले पाहिजे कारण प्रत्येक वेळेला अपयशच हाती येईल असे नसते, तसेच प्रत्येक वेळेस आपण फसवलेच जाऊ असे नसते. असे कवयित्री यातून सूचित करत आहेत. प्रयत्न, जिद्द, आशावाद ही मूल्ये अधोरेखित करण्यासाठी कवयित्रीने येथे नाण्याचा संदर्भ वापरला आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : अल्पाक्षरत्व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवयित्रीने येथे कमीत कमी शब्दांतून अर्थगर्भ आशय व्यक्त केला आहे. अतिशय सूचक व समर्पक उदाहरणाद्वारे कवयित्रीने आशावादी विचार मांडला आहे. यमक अलंकार व गेयेतेने सजलेल्या हया कवितेतून आशावादी, भावनेची रुजवणूक होते.

कविता – आकाशी झेप घे रे.
‘घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले.’
आशयसौंदर्य : सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची ‘आकाशी झेप घे रे’ ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे आणि उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.
काव्यसौंदर्य : वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.
भाषिक वैशिष्ट्ये : ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ‘पिंजरा’ हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे आणि त्यात कैद झालेल्या मानवी मनाला ‘पक्षी’ म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने’
आशयसौंदर्य : ‘आकाशी झेप घे रे’ कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदण्याचा, तसेच स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे सर करण्याचा संदेश दिला आहे.
काव्यसौंदर्य : प्रस्तुत काव्यपंक्तीत कवीने पिंजऱ्यातील पाखराचे प्रतीक वापरत मानवाला स्वसामर्थ्याने कर्तृत्व गाजवण्याची प्रेरणा दिली आहे. माणसाने आपल्या क्षमता ओळखाव्यात, कष्ट करावेत, जिद्दीने संकटांवर मात करत यश मिळवावे असा अतिशय प्रेरक संदेश या कवितेतून मिळतो. स्वकष्टाचे, स्वसामर्थ्याचे, स्वावलंबनाचे महत्त्व अतिशय साध्या सोप्या भाषेत ठसवणारी ही ओळ प्रेरणादायी आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : सहज, सोप्या, पण आशयघन शब्दांमुळे ही संदेशपर कविता अतिशय अर्थपूर्ण झाली आहे. कवितेच्या भाषेत एक सहजता, गोडवा आहे. देवाने सामर्थ्याने अशा शब्दाद्वारे यमक अलंकार साधल्यामुळे काव्यास लयबद्धता प्राप्त झाली आहे. द, र अशा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन ‘अनुप्रास’ अलंकार साधला गेला आहे. त्यामुळे, काव्यांशाचे नादमाधुर्य वाढले आहे.

‘कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते’
आशयसौंदर्य : ‘आकाशी झेप घे रे’ कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदण्याचा, तसेच स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे सर करण्याचा संदेश दिला आहे.
काव्यसौंदर्य : प्रस्तुत ओळींद्वारे कवी मानवाला आळस सोडून प्रयत्नवादाची, कष्टाची, परिश्रमाची कास धरावयास सांगत आहे.मानवाला स्वसामर्थ्याने कर्तृत्व गाजवण्याची प्रेरणा दिली आहे. माणसाला माहित आहे की कष्टाशिवाय फळ मिळत नाही हे जरी माहित असले तरी प्रत्यक्ष आचरणात आणत नाही. स्वकष्टाचे, महत्त्व अतिशय साध्या सोप्या भाषेत ठसवणारी ही ओळ प्रेरणादायी आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत कवीने साध्या, सोप्या; पण अर्थगर्भ व नादमय शब्दांची योजना केली आहे. ‘क’, ‘ळ’ या अक्षरांची पुनरावृत्ती झाल्याने येथे अनुप्रास अलंकार साधला आहे. तसेच, मिळते- वळते अशा शब्दांच्या पुनरावृत्तीतून यमक अलंकार साधल्यामुळे कवितेला लयबद्धता प्राप्त झाली आहे.

कविता – तू झालास मूक समाजाचा नायक
‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’
आशयसौंदर्य : प्रस्तुत कविता कवी ज. वि. पवार यांच्या नाकेबंदी’ या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. त्यात महाड येथील चवदार तळयाच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवाप्रीत्यर्थ ही कविता लिहिली गेली आहे. रूढ धार्मिक, सामाजिक बंधनांना झुगारून नव्या समाजाची पायाभरणी करणाऱ्या कर्तृत्ववान नायकाला प्रस्तुत  कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे.
काव्यसौंदर्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द महाकाव्ये जिथे थिटी पढावीत, लीन व्हावीत इतके तेजस्वी, ओजस्वी होते. चवदार तळयाच्या सत्याग्रहासमयी त्यांनी जनसमुदायाला जे आवाहन केले होते त्यातील शब्दसामर्थ्य अजोड होते. त्यांनी उभारलेला मानवतेच्या हक्कांसाठीचा चवदार तळयाचा हा लढा असा होता, की साध्यासुध्या काठ्यांनाही जिथे संगिनीचे सामर्थ्य प्राप्त व्हावे; सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही आत्मभान येऊन स्वतःतील असामान्यत्वाची प्रचीती यावी, बळ यावे असा संघर्ष त्यानी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उभारला होता.
भाषिक वैशिष्ट्ये : प्रस्तुत ओळीतून या घटनेचा इतिहास मांडताना. कवी रसिक वाचकाला वीररसाचा प्रत्यय आणून देतो. या समाजप्रबोधनपर कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. कवितेचा आशय छंदोबद्ध रचनेत बंदिस्त न करता त्याच्या गरजेनुसार मुक्त ठेवल्याने कवितेतील कवीचे मनोगत पेट रसिक वाचकापर्यंत पोहोचते कवीने संवादपर शैलीत भाष्य केल्यामुळे जगू काही कवी डॉ. आंबेडकरांशी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. या संवादशैलीमुळे कवितेच्या सौंदर्यात भर घातली गेली आहे. काठ्या व संगिनी या प्रतीकांचा मोठ्या खुबीने वापर करून कवीने कवितेला एक आगळे परिमाण दिले आहे. अशा आशयघन शब्दरचनेतून बाबासाहेबांच्या संघर्षाची तीव्रता व महानता वाचकांपर्यंत पोहोचते.

‘तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.’ (सप्टें. ‘२१)
आशयसौंदर्य :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित व पीडित जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला. मूकसमाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये त्यांच्या महत्कार्याचा गौरव करताना उपरोक्त ओळी लिहिल्या आहेत.
काव्यसौंदर्य : चवदार तळ्याच्या संग्रामाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची थोरवी गाताना कवी म्हणतात- प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही या वर्णव्यवस्थेने ग्रासलेल्या समाजाला जागृत केलेत. त्यांना नवविचारांची प्रेरणा देऊन नवीन इतिहास घडवला. अन्याय सहन करणाऱ्या जनतेचे तुम्ही महानायक झालात. बहिष्कृत असलेल्या पीडित समाजात नवचैतन्य निर्माण केलेत. त्यांच्यातील आत्मविश्वास जागवलात.
भाषिक वैशिष्ट्ये : मुक्तशैलीमध्ये लिहिलेली ही कविता त्यातील समर्पक शब्दांमुळे अर्थवाहक झाली आहे. ‘मूक समाज’, ‘बहिष्कृत भारत’ या संकल्पनांचा यथोचित वापर केल्यामुळे कविता परिणामकारक झाली आहे. सुयोग्य व ठाशीव शब्दकळा हे या कवितेचे बलस्थान आहे. थेट शब्दकळेमुळे ओज हा गुण दिसून येतो. आशयाला समर्पक अभिव्यक्तीची जोड मिळाल्यामुळे ओळी रसिकांच्या काळजाला भिडतात.

‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय. ‘
आशयसौंदर्य :दलितांवरील अन्यायाविरुद्ध डॉ. बाबासाहेब लढा हा ‘चवदार तळ्याचा संग्राम’ म्हणून उत्तर : आंबेडकरांनी पुकारलेला प्रसिद्ध आहे. या लढ्याला पन्नास वर्षे उलटून गेल्यावर ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये या महामानवाला अभिवादन केले आहे. उपरोक्त ओळींत आताच्या परिस्थितीचे विदारक वर्णन केले आहे.
काव्यसौंदर्य :पन्नास वर्षे झाल्यानंतर चवदार तळ्याच्या संग्रामाचा ऊहापोह करताना आणि लढा थंड झाल्याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात – सुख-समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेतायत. परिस्थितीत बदल न झाल्यामुळे संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगूल तुझी वाट बघत आहे. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळला असला, तरी पुन्हा पेटण्यासाठी पाणी आसुसलेले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : ही कविता मुक्तछंदात (मुक्तशैली) आहे. त्यामुळे भावनांचे व विचारांचे थेट प्रसारण योग्य शब्दांत झाले आहे. सूर्यफुले व बिगूल या प्रतीकांमुळे आशयघनता वाढली आहे. ‘चवदार तळ्याचं पाणी थंड पडणं’ या वाक्यखंडातून आताच्या विदारक परिस्थितीवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे.


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here