पाठ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा. |
लेखक प्रा.डॉ.महेंद्र कदम यांनी पाठासंदर्भात / आगळ कादंबरी संदर्भात मांडलेले विचार |
⇐ कृती ⇒ |
प्रश्न १ ला : पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा.
. |
( २) : खालील मुद्दयांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.
आजी
¦—— आजीचे दिसणे.
¦—— आजीचे राहणीमान.
¦—— आजीचे सौंदर्य.
¦—— आजीची शिस्त.
आजीचे दिसणे :
आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.
आजीचे राहणीमान :
त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.
आजीचे सौंदर्य :
आजीचे वय आता सत्तर वर्षांचे होते. उन्हापावसामुळे आजीची त्वचा रापली होती. पण तिचा मूळ गोरा वर्ण लपत नव्हता. तिचे दात मोत्यांसारखे चमकत होते. विशाल कान व धारदार नाक यांनी आजीच्या सौंदर्यात भर पडत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी तिच्या सौंदर्यात उणेपणा आला नव्हता.
आजीची शिस्त :
आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.
बालपणी लाभलेल्या रानमेव्यांची नावे सांगा. (कोणतीही चार नावे लिहा.)
- गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे व कच्च्या कैऱ्या, बोरे, चिंचेची कोवळी पाने.
- उंबर, ढाळे, भाजलेली कणसे, हुरडा.
- कच्ची वांगी, गवार, टोमॅटो, शहाळे.
- कलिंगड, शिंगाडे (चिबूड), करडीची भाजी, ज्वारीचे कणीस.
- कवठ, तुरी-मटकीच्या शेंगा, उकडलेल्या शेंगा, कुळथाचे पिठले.
.
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं,’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
‘आगळ’ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. धान्य निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची.
वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.
. |
तुलना करा / साम्य लिहा :
आगळ : वाड्याचे संरक्षक कवच ⇔ आजी : कुटुंबाचे संरक्षक कवच किंवा
‘आजी म्हणजे घराचा आधार’ हे विधान सोदाहरण पटवून दया. (मार्च १९)
आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोरी होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते.
प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळेइतकेच भक्कम होते.
. |
आगळ लावण्याची/टाकण्याची पद्धत समजावून सांगा.
आगळ म्हणजे एक सागवानी अवजड वासा होता. त्याच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवला होता. वाघाच्या जबड्यात एक भक्कम कडी बसवलेली होती. त्या कडीला धरून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते. दरवाज्याच्या दोन बाजूंना आगळ अडकवण्यासाठी भिंतींत दोन कोनाडे केलेले असतात. त्यांपैकी एक कोनाडा आगळ पूर्ण सामावली जाईल इतका खोल असतो. कडीला धरून आगळ कोनाड्यात पूर्ण ढकलली की दरवाजा उघडता येतो.
रात्रीच्या वेळी, दरवाजा बंद करून कोनाड्यात ढकलून ठेवलेली आगळ कडीला धरून ओढून बाहेर काढली जाते आणि ते टोक दुसऱ्या भिंतीच्या कोनाड्यात अडकवले जाते. अशा त-हेने आगळ बसवली की दरवाजा कोणीही उघडू शकत नाही.
. |
दुपारच्या वेळी मुलांकडून केल्या जाणाऱ्या कल्पक कृती.
कधी कधी बैठ्या खेळांऐवजी मुले वेगवेगळ्या कल्पक कृती करीत असत. एखादया वेळी सरपणातली लाकडे काढून विटी-दांडू किंवा भोवरे तयार करीत बसत. भिंगऱ्या तयार करण्यासाठी घेतलेला लाकडाचा तुकडा दगडावर घासून घासून त्याला गोल आकार देण्याचा मुले प्रयत्न करीत. हे मोठे कष्टाचे काम असे. चुलीची काजळी लागून लागून काळ्या कुळकुळीत बनलेल्या खापऱ्या पाटीवर घासून घासून पाठीला काळा कुळकुळीत रंग आणण्याचा प्रयत्न करीत बसत.
बैलगाड्या बनवण्यासाठी ज्वारीची ताटे वापरीत. लाल माती आणून बैल बनवत बसत. गोल आकाराचे गोटे जमवून ते सर्व बाजूंनी दगडावर घासून घासून त्याने छान गोल आकार दयायचा प्रयत्न करीत बसत. अशा अनेक कल्पक कृती करण्यात मुले दंग होत.
. |
पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंबपद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.
या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे.
या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात; याचा कुटुंबालाच फायदा होतो, हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.
. |
पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात.
ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्याकोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते.
पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आपल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून ‘आजी : कुटुंबाचं आगळ’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.
. |
आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्यकता वाटते का? तुमचे मत सोदाहरण लिहा.
एकत्र कुटुंब पद्धतीचे काही फायदे आहेत; तसे काही तोटेही आहेत. तोटे काढून टाकले, तर एकत्र कुटुंब पद्धत आजच्या काळात खूप उपयोगी होऊ शकते. एकत्र कुटुंब पद्धतीत व्यक्तीला स्वत:चा वैयक्तिक विकास करून घेण्याची संधी खूप कमी प्रमाणात मिळते. व्यक्ती कुटुंबाशी बांधली जाते. कुटुंबाच्या अडीअडचणी, कुटुंबाची कामे, जबाबदाऱ्या यांच्यात ती गुरफटली जाते. कुटुंब एका व्यक्तीच्या नियंत्रणात राहते.
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबात सर्व वयोगटातील माणसे असतात. वयस्क माणसांची कार्यक्षमता खुप कमी झालेली असते. त्यांना स्वत:च्या गरज भागवणे जिकिरीचे बनते. त्या वयात त्यांना इतरांच्या मदतीची खूप गरज असते. त्यांना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आधार मिळतो. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही एकत्र कुटुंब पद्धतीत खूप आधार मिळतो. आजच्या काळात आई-बाबा दोघेही नोकरी करतात. त्यामुळे घरी मुलांची काळजी घेणारे कोणीही नसते. मुलांची आबाळ होते. त्यांचे खाणेपिणे, त्यांचा अभ्यास वगैरे बाबींकडे लक्ष देणारे कोणी नसते. अशा स्थितीत घरी आजी-आजोबा असतील, तर ते मुलांकडे लक्ष देऊ शकतात. आजीआजोबांना समाधानही मिळते. पगारी माणसे घरातल्या माणसांप्रमाणे काळजी घेऊ शकत नाहीत. म्हणून आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
. |
आजी : कुटुंबाचं आगळ पाठ समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇 |
आजी : कुटुंबाचं आगळ पाठावर आधारित online Test सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇 |
. |
– |
– |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️